मेघ नसताना बरसल्या,
मेघ नसताना बरसल्या, पावसाचा, उलगडा
जाहला नाही, मला त्या, आसवाचा उलगडा
पाशवी शक्त्तीस देते, जन्म का ही शान्तता?
होत नाही, मज अगान्तुक, वादळाचा उलगडा
उकल कोडयांची हजारो, आजवर केली खरी
माणसाला, पण कुठे, झाला स्वतःचा, उलगडा
उलगडा झाला असे, वैज्ञानिकाला वाटते
हाय! पण, करतोच आहे, उलगडयाचा उलगडा
गोष्ट, आपोआप जेव्हा, उलगडाया लागते
होत जातो, हरतऱ्हेने, वास्तवाचा उलगडा
फूल उमलावे तसे ही, प्रीत उमलत चालली
आरशाला, होत आहे, आरशाचा उलगडा
उलगडयाला, उलगडावे, लागते केव्हा तरी
हाच तर, आहे `इलाही', जीवनाचा उलगडा
|