मी रेशनच्या, रांगेमध्ये,
मी रेशनच्या, रांगेमध्ये, उभा राहतो आता
शिवार विकुनी, आल्याची मी, सजा भोगतो आता
शहरामधल्या, संस्कारांनी, हेच शिकविले मजला
गावाकडच्या, पागोटयांना, नित्य टाळतो आता
आप्तेष्टांनी, पैशामध्ये, मला जोखले आहे
भावभावना, सारे भंकस, असे मानतो आता
मला मुखवटे, बदलायाचे, कसब साधले आहे
आरशास मी, चुटकीसरशी, सहज बनवितो आता
जेव्हापासुन, भरू लागली, घरी लक्षुमी पाणी
एक दोन झोपेच्या गोळ्या, शांत झोपतो आता
वॄद्धाश्रमची सुंदर आणी, भव्य इमारत आहे
त्या दोघांना, सवडीने मी, तिथे भेटतो आता
संध्याछाया, तशीच माया, घेउन दारी आली
अडगळीतल्या, वस्तूंमध्ये, ,मला शोधतो आता
वारसहक्क मिळावा तैसा, आश्रमात या आलो
कुणी तरी येईल भेटण्या, वाट पाहतो आता
|