मी क्षितिजाच्या, पल्याड
मी क्षितिजाच्या, पल्याड निघुनी, जावे म्हणतो
आकाशाला, कायमचे, टाळावे म्हणतो
उजाड माळावरी कधी का, वसंत येतो?
या धरतीला, बहर नवे मी, द्यावे म्हणतो
काळजातला, दाह शमविण्या, इलाज म्हणुनी
मिळाल्यास मी, घोट विजेचे, घ्यावे म्हणतो
काल तारका, असेल बहुधा, शिळा जाहली
असेन मी उ:शाप, तिला स्पर्शावे म्हणतो
पैलतटाला, ऐलतटाची, ओढ असावी
पूल होऊनी, मीलन मी, घडवावे म्हणतो
डोंगर, भास्कर, झाड, नभी उडणारे पक्षी
बालपणीचे, चित्रे पुन्हा, रेखावे म्हणतो
सैरभैर होतील वेदना, नसानसातून
वणव्यासम मी, नखशिखान्त, पेटावे म्हणतो
कळ्या, फुलांनो! भाग्य मला लाभेल कधी का?
तुम्हासारखे, दंवात मीही, न्हावे म्हणतो
जिथे कुठे असशील एकटी, ऐकशील तू
शब्द सुरविण, गीत तुझे मी, गावे म्हणतो
जीवनाची, राखरांगोळी, माझ्या कविता
उरले सुरले, क्षण तिजला, अर्पावे म्हणतो
स्वप्नांना मी, दिले निमंत्रण, पुन्हा `इलाही'
ह्रदय, नव्या जखमांनी मी, सजवावे म्हणतो
|