मावळतीचा, सूर्य उगवला,
मावळतीचा, सूर्य उगवला, पापण काठावरी
स्वप्नकळीची, करण्या आला, राखण काठावरी
हूल देउनी, चाहुलीस ती, निघून गेली कुठे?
कुणी राधिका, सोडुन गेली, पैंजण काठावरी
कैद करोनी, ठेविलास तू, अश्रूंचा काफला
सांग कोणते, लावलेस तू, कुंपण काठावरी
उंबरठयाने, का इतुकी ही, दिली भयानक सजा
अनाथापरी, बसून आहे, अंगण काठावरी
जिथे पाहिले, दरवळणारे, स्वप्नांचे ताटवे
वावरताना, दिसतो आता, श्रावण काठावरी
एकान्ताच्या, लोचनातुनी, टपटपणारी फुले
आकान्ताची, करीत आहे, पखरण काठावरी
कासा बुडाला, कुणी बुडविला, हिरा सागरामधे
मॄतदेहासम, वहात आले, कोंदण काठावरी
इथेच, कोठेतरी हरवले, बिंब काळजातले
हाका मारत, भटकत असतो, दर्पण काठावरी
बोलत नाही, खेळत नाही, लाटासंगे अता
कळे न मजला, कसले आले, दडपण काठावरी
अवस असो वा, दिवस `इलाही', उधाणती भावना
नित्य भेटते, तिची आठवण, चांदण काठावरी
|