माझ्याभवती, माथ्यावरती,
माझ्याभवती, माथ्यावरती, दिवे काजवे तारे
तिमिरामधले, खरे सोबती, दिवे काजवे तारे
एकान्ताच्या, मंदिरातली, आठवणींची पूजा
गाण्या येती, तुझी आरती, दिवे काजवे तारे
एकाकी, इतुका एकाकी, राहू द्या ना मजला
खरे सांगतो, नको वाटती, दिवे काजवे तारे
तुझ्या जराशा, सहवासाने, तेजोमय मी झालो
हवी कशाला, अजून पणती, दिवे काजवे तारे
वाडळ वारे, मेघ गर्जना, काळोखाच्या रात्री
तुझी आठवण, सखी सोबती, दिवे काजवे तारे
कुणी सोडला, चराचरावर, गर्द जांभळा पडदा
कुणी रेखिले, अन् त्यावरती, दिवे काजवे तारे
विश्र्वासाच्या, शय्येवरती, शांत झोपली दुनिया
खडा पहारा, गस्त घालती, दिवे काजवे तारे
विश्र्व गिळोनी, सुस्त पहुडला, अजगर अंधाराचा
अजस्र देहावर त्या, दिसती, दिवे काजवे तारे
सूर्याचे तर, वैर `इलाही', सदा टाळले त्याने
रजनीचे हे, खरे सोबती, दिवे काजवे तारे
|