काय केतकी, कसले बन हे,
काय केतकी, कसले बन हे, मगरमिठी सापांची
पिंपळावरी सत्ता चाले, या भटक्या बगळ्यांची
गुन्हेगार ती असेल बहुधा, लपत छपत जी फिरते
हद्दपार मानवता केली, फळे तिच्या कर्मांची
शेकोटीची गरज म्हणोनी, पेटविले घर माझे
खरेच तेव्हा, ओळख पटली, मजला शेजाऱ्यांची
बदलायाला हवे अता हे, सरोवराचे पाणी
नाही तर मग, उजाड होइल, वस्ती या कमळांची
एकनाथ महाराज बोलले, ``आधी कळस मग पाया''
दारिद्रयाच्या, रेषेखाली, यादी श्रीमन्तांची
तारुण्याच्या नशेत सारी, कुस्करली मी नाती
आता माझ्याभवती गर्दी, माझ्या किंकाळ्यांची
माझे जीवन, म्हणजे केवळ, अळवावरचे पाणी
सांग `इलाही', करू कशाला, मोजदाद श्र्वासांची?
|