हा नजरेचा, खेळ म्हणू की,
हा नजरेचा, खेळ म्हणू की, नयनांची आरास म्हणू?
आभासाला, स्वप्न म्हणू की, स्वप्नाला आभास म्हणू?
सांग लते ही, आसक्त्ती की, तू केलेली, ही सक्त्ती
कळ्या-फुलांची, तू माता की, तुजला कारावास म्हणू?
जशी प्रर्थाना, जशी साधना, तशीच ही वंचना तुझी
वेदनेस मी, श्र्वास म्हणू की, ह्रदयाचा गळफास म्हणू?
ओयासिस जे थोडे होते, तेही केले गायब तू
माझ्यावरच्या, प्रीतीची ही, आस म्हणू, हव्यास म्हणू?
मोहर कसला, बहर कशाचा, पाने सारी गळलेली
कात टाकली वृक्षाने की, हा त्याचा, संन्यास म्हणू?
रोजनिशीच्या, पानालाही, कसर लागते कधी कधी
ललाटलेखालाही आता, खराखुरा, इतिहास म्हणू?
आणाभाका चलनी नाणी, नको `इलाही' उधळू तू
तळहातांच्या रेषांनाही, चल, आपण विश्र्वास म्हणू?
|