घनतिमिराची, चिरून छाती
घनतिमिराची, चिरून छाती येईल भास्कर वाट पहा
सुरवंटाचे, फूलपाखरू, होइल तोवर वाट पहा
वाट पाहणे, घोर तपस्या, घोर साधना खरीच रे
कातळासही, एके दिवशी, फुटेल पाझर वाट पहा
हा वठलेला, वृक्ष नव्हे रे, पानगळीची प्रेतकळा
पुन्हा एकदा, येतिल पाने, येइल मोहर वाट पहा
गोष्ट तशी ती, गोष्ट न केवळ, बोध घ्यायला हवास तू
एक एक टाकून खदा बघ, भरेल घागर वाट पहा
हात बांधुनी, बसणे म्हणजे, वाट पाहणे, नव्हे खुळ्या
प्रयत्नात अन्, श्रद्धेमध्ये, असतो ईश्र्वर वाट पहा
वळून मागे, नकोस पाहू, नकोस कोठे थांबू तू
प्रवासात या, मिळेल तुजला, जिवलग मैतर वाट पहा
तुझ्या अंतरी, दिसतिल तुजला, सुर्य चंद्र अन् तारेही
तुझ्या `इलाही', ह्रदयाचे तू, करून अम्बर वाट पहा
|