मुक्त्तक
शब्दांच्याही, पल्याड असते, माझी कविता
केवळ रसिकालाही, दिसते, माझी कविता
दिसते म्हणजे, तशीच असते, असेहि नाही
आभासाच्या, गावी वसते, माझी कविता
गवसणीत गेली वीणा
गवसणीत गेली वीणा, बासनात कविता
सूर अन्तरी विरले अन्, आसवात कविता
मदालसा दारी यावी, चिंब चिंब ओली
तशी भेटण्याला येते, पावसात कविता
चिऊ काउलाही असते, निवाऱ्यास घरटे
एकटीच वणवण भटके, भर उन्हात कविता
कधी रूप निशिगंधाचे, कधी रातराणी
दरवळे अहर्निश माझ्या, काळजात कविता
कशाला करावी सांगा, तमा मी तमाची
सांजवात कविता माझी, चांदरात कविता
कळी उमलती कविता अन्, रसिक भ्रमर झाले
अता कुठे आली माझी, यौवनात कविता
वाचता तुला जर आले, वाच चंद्र तारे
किती सांगू वेडया, अम्बरात कविता
एकवढयाचसाठी घेतो, कोंडुनी स्वतःला
दिसे मला एकान्ताच्या, आरशात कविता
समाधिस्त होऊन जेव्हा, बैसतो `इलाही'
शब्दफुले टपटप पडती, पारिजात कविता
|