धुरात आणी, धुक्यात आता,
धुरात आणी, धुक्यात आता, फरक राहिला नाही
निखाऱ्यात अन्, दवात आता, फरक राहिला नाही
दारिद्रयाने, भेद मिटविले, कृपा केवढी केली
आसवांत, पावसात आता, फरक राहिला नाही
आरस्पानी, म्हणता म्हणता, तडा जिभेला गेला
शिळेत अन्, आरशात आता, फरक राहिला नाही
कुणास टाळू, कुणास माळू, सांग वाटिके मजला
शुलात आणी फुलात आता फरक राहिला नाही
बंद दार अन् बंद कवाडे, बंद मूठ लाखाची
घरात अन्, अंगंणात आता, फरक राहिला नाही
कलीयुगाच्या, खात्यावरती, जमा करूया हेही
मानवात, दानवात आता, फरक राहिला नाही
अपंग झाल्या, नजरेने का, दोष रवीला द्यावा
प्रकाशात अन्, तमात आता, फरक राहिला नाही
खरेच केवळ, जगण्यासाठी, नित्य `इलाही' मरतो
मृत्यू अन् जीवनात आता, फरक राहिला नाही
|