भासही पुरतील मजला,
भासही पुरतील मजला, भोवती आभास हो
या जिवाला, जगविणारा, फक्त्त तू तो, श्र्वास हो
बिंब होवोनी जळावर, उतरलेला चांदवा
तू तसा, उतरून माझ्या, लोचनी आरास हो
सांग मी वेचू कशाला, ही वसन्ताची फुले
बहर मी होते तुझा रे, तू सख्या मधुमास हो
जो तुझा नाही असा, मज क्षण नको रे, एकही
वेड हो तू, ओढ हो तू, आस हो तू, ध्यास हो
जीवनाला, तू कहाणी वा कथा, बनवू नको
सूर्य तेजोमय जसा, माझा तसा, इतिहास हो
बांध शपथांचे कशाला, व्यर्थ रे घालायचे?
मी तुजा विश्र्वास आहे, तू तसा, विश्र्वास हो
कोणते अस्तित्व आहे, मज `इलाही' तुजविना
मी उमलते फूल, माझा रंग हो, तू वास हो
|