आरोळी
१.
दोन शब्द बोलायला सुद्धा,
वेळ त्यांना मिळत नाही ।
यांच्याकडे भरपूर वेळ असताना,
बोलायचं मात्र कळत नाही ।
२.
देवाला सुद्धा आज,
खऱ्या भक्तीची आस आहे ।
त्याचेच होई दर्शन,
ज्याच्या जवळ पास आहे ।
३.
खायला मिळत नसल्याने
आपलं मन ते जाळत आहेत ।
ह्यांना, हवं ते मिळून सुद्धा,
पथ्ये मात्र पाळत आहेत ।
४.
शब्दांवर पुर्वी व्यवहार व्हायचा,
हे जरी मज पटत नाही ।
कामाच्या मोबदल्यात मिळालेला,
चेक आज वटत नाही ।
५.
दगडाला सुद्धा, प्रेमाने
पाझर फुटु शकतो ।
नाहीतर एका घावात,
तुकडे होऊन फुटू शकतो ।
६.
पाण्यात उडी मारताच,
बुडून माणसं मरतात ।
मेल्यावर तीच प्रेत बनून,
त्याच पाण्यावर तरंगतात ।
७.
देवाचे अस्तित्व
देवळातच असते
मुर्ती जागेवर नसलीतरी
खऱ्या भक्तालाच दिसते ।
८.
उर भरून आलं तेव्हा,
मिठीत तु हवी होती ।
आज मिठीत माझ्या असताना,
ओळख तुझी नवी होती ।
९.
डोळे चिंब व्हायचे तेव्हा,
तुझे किती चुकले होते ।
आज झेलायला थेंब असताना,
अश्रु माझे सुकले होते ।
१०.
हाकेला धावून प्रत्येकवेळी,
मैत्रीला ते जागले होते ।
तुझ्यासोबत आज मात्र,
वैऱ्यांसारखे वागले होते । |