आमदार होता... होता...
लोकहो.. नमस्कार... खरं म्हणजे स्वप्न तर सारेच पाहतात... अन स्वप्न पाहणे म्हणजे काय खूप काही मोठा गुन्हा नव्हे.. भिकारी हजारीमल होण्याची स्वप्न पाहू शकतो तर हजारीमल लक्षाधीश होण्याची... लक्षाधीश करोडपती बनण्याची... मग स्टार प्लसवरील उत्तरे देऊन का होईना!! प्रत्येकाचे एखादे स्वप्न असतेच.. आन... तसेच माझेही.. मलाही वाटतं खूप मोठं व्हावं.. तसं मोठं व्हायला काय अक्कल लागते व्हय!! पन मोठं म्हणजे शरीराने, उंचीने नव्हे तर पैशाने संपत्तीने!!! पण मग व्हायचे कसे? स्टाईल म्हणून शिंप्याने शर्टाला खिसा शिवलेला. पण त्याचा खरा उपयोग काय होत नव्हता.. पैसा ठेवायला असेल तर ना!! इथं पैसा यायच्या आधी उधारी करून बसायचो... पण तरीही स्वप्न मोठे पहायचो.... कधी वाटायचं व्यावसायिक व्हावं...पण त्याकरता गुंतवणुकीचा प्रश्न. कधी वाटायचं चांगली नोकरई देणाराच स्वतः बेरोजगार होण्याच्या भीतीने बसलेला... आणि जरी मिळाली तरी त्या पगारात हप्ते वळीत होण्याची भीती! अशा या विचारानं डोकं फुटायची वेळ आली. अन त्या विचार्ट असताना कुणीतरी अंगावर येऊन धडकला...
ताडकन उठलो अन दिली त्याच्या कानफाडीत, तसा कोलमडला.. मग बघ्याची गर्दी .. आणि मग, मी सुरूवात केल्यावर बाकीच्यांनी हात धुऊन घेतला. इतर लोक माझ्यावर खूष.. व्वा ! काय चोपलंस... व्वा!! व्वा... व्वा .. चा जयजयकार करीत घेतलं साऱ्यांनी डोक्यावर .. मग काय? आयताच बिगरगुंतवणुकीचा धंदा मिळाल. कुणी पैसे देऊन चोपायला लावी... तर कुणी घर खाली करून दिल्याबद्दल मोबदला देई.. आयला!!! बघताबघता चांगलाच पैसा खेळायला लागला.. वरून चारचौघात वट वाढली.. हळूहळू अख्ख्या भागात प्रसिद्ध झालो. जो. तो येई अन आपले गाऱ्हाण गाई.. मग मी त्यावर तोडगा काढी... वासरात लंगडी गाय शहाणी तशी... अन न कळत मी कधी समाजसेवक झालो कळलंच नाही. मी करायचो पैसे घेऊन.. लोकांना वाटायचं समाजासाठी धडपडतोय... साथीला चार-पाच टकुरी पण गोळा झाली... उगाच सोबत राहायची.. खायला.. प्यायला भेटायचं ना फुकट ! मग माझ्या `हा' ला `हा' म्हणायची माझ्याकडून चुकून झालेल्या चुकीलासुद्धा `ग्रेट' बोलायची... मग मी पण जरा सोकावलो आनि माझ्या डोक्यात हवा शिरू लागली... आता लोकच म्हणतात तर ख्ररोखर समाजसेवक व्हायचं... म्हणजे अण्णा हजारे नव्हे.. पन सरळ निवडणुकीला उभं राहून आमदार व्हायचं ... जरी लोकांनी निवडून नाही दिलं तरी आतल्या वाटेनं का होईना... पण आमदार व्हायचं... म्हणजे.. व्हायचंच ठरलं.... निवडणुकीला उभं राहायचं.
पण कुणाकडनं? ... मोठा प्रश्न... शोधाशोधा सुरु.. तसा माझ्या जोडीदाराने शाखेत जायचा सल्ला दिला.. ताडकन उठलो.. न बँकेच्या एका शाखेत गेलो... बाजूवाला खेकसला... अरे ही शाखा नव्हे... पक्षाची.. संघटनेची.. तेव्हां कुठं लक्षात आलं.. मग सैनिक बनून शाखेत गेलो... तर त्यांनी वरून-खालून पाहत विचारले.. मराठीतच.. दोन चार शिव्या द्या बरं... झाली का फजिती.. कुणाला येतात शिव्या.. मग युवक कॉंग्रेसचे कार्यालय गाठले.... पन तिथे आधीच एवढी गर्दी की विचारायची सोयच नाही.
मला वाटलं... एखादी सभा जमवली असेल... पण श्रोते कुणीच नव्हते.. होते ते सारे नेतेच.. अर...र...रं ऽ ऽ इथं काय, या जन्मी तरी सीट भेटायची नाही. .. तसाच फिरलो माघारी.. अन सरळ संघात जायचं ठरवल.. पण हाफचड्डी घालायची सक्ती.. नको म्हतलं.. त्या हाफचड्डीपेक्षा गुडघ्यापर्यंतचा बरमुडा बरा.... आयला !! आपल्या लायकीचा एखादा पक्ष दिसत नाही की काय.. याचा विचार बसलो, बराच वेळ !! मग वेळ बघायला गेलो तसे घड्याळ दिसले.. तर... त्यात बारा वाजले होते.. मनात विचार आला .... आपले पण बारा वाजतात की काय ? तरी पण राहावलं नाही म्हणून त्यांच्याकडे गेलो, तर त्यांनी विचारायच्या आधीच सांगायला सुरूवात केली की, इथं फक्त बंडखोर अन एखाद्या पक्षातून हकालपट्टी झालेल्यांनाच वाव आहे.. नवख्यांना संधी नाही.. आता बसा बोंबलंत !!! या जन्मात काय नेता होता येणार नाही वाटतं ! आता काय करावं !! असा विचार करीत बसलो तोच परत माझ्या आजूबाजूचा एक बोंबलला.... ``मनसे'' मी म्हणालो... ``किसके मनसे''? तर तो म्हणाला ``मनसे''.. अरे हो .. पण ``किसके मनसे''? परत म्हणाला ``मनसे'' शेवटी मनसे याचा अर्थ गुलदस्त्यातच राहीला.. आणि मला शेवटपर्यंत कळलाच नाही.. अजूनही नाही !! संस्कृती लाभलेल्या राष्ट्रात मला साध्या शब्दाचा अर्थ न कळावा...? मग ``दासबोध'' काय कळणार..? इतक्याट दासबोधवरून मला ते स्वमी `रामदास' आठवले.. साक्षात उगवता सूर्य !!! पण त्यांच्यासोबत जाणे म्हणजे फाटक्या गोधडीला ठिगळ लावल्यासारखं... कय त्या ठिगळाचा उपयोग? शेवटी नाईलाजास्तव समाजासाठी समाजवादी व्हावयास त्यांच्याकडेही गेलो, पण त्यांचा समाजवाद म्हणजे समाजामध्ये घडवलेला ``वाद'' मुलाखतीला गेल्यावर मला विचारतात, निवडून आल्यावर काय कराल ?.. मी म्हटलं समाजसेवा... तर ते म्हणतात, बोलायला ठीक आहे, पण कुठल्या समाजाची सेवा कराल?? आयला !! याचा समाज दोन भिन्न समाजामध्ये विखुरलेला दिसतोय.. अन मी काढता पाय घेतला... येता येता वाटेतल्या गल्लीत जनता दलाचे कार्यालय दिसले.. उगाच डोकवायच म्हणून डोकावल तरं त्यांनी सरळ आत खेचलं !! ... म्हणाले.. पक्षाची उमेदवारी हवीय का ? .. विचार न करता लगेच हो म्हटलं... तर त्यांनी पक्षासाठी / पक्षबांधणीसाठी पैसे मागितले अन त्याला ``अनुदान'' म्हणू लागले.... निवडून आल्यावर संडास व गटारे बांधायचा सपाटा, लावायचा, एका वर्षात अनुदान दिलेले वसूल व नंतर नफा .. मी म्हटलं.. अहो पण.... सर्व गटारे आधीच बांधून झाली असतील तर !! तर त्यावर झाकणं लावायची... स्लॅब टाकायचा.. गटारं बुझवायची.. मग तुंबली की तोडायची.. अन परत बांधायची.... कारण जनतेचा पैसा गटारावरच खर्च करायचा... व्वा !! ... काय विचार आहेत यांचे... समाजसेवा म्हणावी की ``माजसेवा''.. बस्स .. आता मात्र मी खरा वैतागलो... अक्ष्ररशः वाघासारखा लालबुंद झालो.... हातातले ``धनुष्य'' खाली ठेवले. ``हाताचा पंजा'' सरळ करून मनगटावरील ``घड्याळ'' काढून फेकून दिले, एका हातान ``कंदील'' फाडला, उडी मारून ``हत्ती'' वर बसलो, अन ``उगवत्या सूर्या''ला ``कमळाचे फूल''' वाहीले आणि ठरवले अपक्ष म्हणूनच उभं रहायचे.. ठरलं! उगाच इकडे तिकडे फिरण्यात अर्धा पैसा खर्च केला.. आणि उरलेला पैसा जवळ ठेवून अपक्ष म्हणून अर्ज भरला. नवीन -खादी सदरे - टोपी - कपडे बरेच खरेदी केलं... सोबतीला चार डोकी होती. त्यांनाही नवीन कपडे घेतले... काय करणार ?? ... सपोर्ट हवा.. जयजयकार करायला पाच माणसं निवडली... त्यांचा रोज ठरवला.. भाषणात गर्दी वाटावी म्हणून तासावर माणसं भाड्याने घेतली. भाषण कळाले नाही तरी उगाच टाळ्या वाजवायचे. जयघोष करायचे कारण प्रत्येक टाळीचा अन जयघोष दर ठरलेला. पत्रकं छापली... चार हॅलोजन समोर लावून फोटोसेशन केले.. कधी हात जोडून तर कधी हात वर करून, बोट दाखवून वगैरे.. वगैरे.. मग घरोघरी जाऊन विनवण्या करू लागलो... निवडणूक आयोगानेसुद्धा विचार करून दिल्यासारखे ``निशाणी'' दिली.... तोंड वासलेलं कुत्रं खरंच किती सर्मपक निशाणी... कुत्रासारखंच तोंड वासून दारोदारी मतांची भीक मागू लागलो... भाषण करायची तर सोय उरली नव्हती.. भाषणात म्हणालो. निवडून आल्यावर गटारे बांधीन, तर हळूच कोणीतरी बोलला का दारू पिऊन पडायला? मी म्हणायचा कुठे हायवेवर ??... मी म्हणायचा .. ``पूल बांधीन''.. तर हळूच कोणीतरी बोलायचा कशावर ?.. गटारावर?.. खरंच बोलायची सोय उरली नव्हती.. अन पैसा पण केव्हाच संपला होता.... पण आता माघाअ नको म्हणून सावकाराकडून व्याजाने पैसे घेतलेले.. होत्याचं नव्हतं झालं!! ... आता निवडून आलो तर ठीक नाहीतर खरंच कुत्र्यागत हाल व्हायचे.. भाषणे रंगली.. निवडणूक रंगली... अन एकदाची पारसुद्धा पडली... आज महत्त्वाचा दिवस... उजाडलेला.. निवडणूक निकालाचा... आज माझा निकाल? ... निवडून आलो तर भावी आमदार.. नोकर... चाकर.. बंगला... गाडी.. व्वा... नुसतं विचारानंच हायसं वाटतंय.. इतक्यात मला जाग आली.. बायको म्हणाली.. उठा!! अंघोळीला जावा !!! खरंच निवडून याच्या अगोदरच मला खरी जाग आली. |