अय्या... नमस्कार करते ही पुन्हा एकदा करते !! ऑं ... आसं कय बघताया? डोळं टवकारून? हां.. मला वाटतंय, तुम्ही मला ओळखलंच ना... आवं ... मी सखुबाई सखाराम साखरे... मेलं साखर आयुष्यात कधी बघाया भेटली न्हाय.... आन तरी नाव नुसतं साखरे... पण हो.... बघा नुसतं नाव घेतलं तरी तोंड गोड हुतया बघा... पण मला सारं.... सारं... आठवतंय.... (थोडं थांबून ) मी की नाय एकदम लहानं व्हते आन आम्ही पूर्वीपासून शेतकरी... आन तेही दुष्काळातलं .... पण तरी आमच्या बानं आम्हाला लहानाचं मोठं केलं! अन भलं मोठं शेत... विकून विकून छोटं केल ! लय छोटं केलं... पन त्यो तरी काय करणार? शेत अठरा एकर... आनं पोरा आठ.... त्यात त्याचं वय झालं साठ... तरी म्हणायचा मी अजून जगीन ताठ.... आन दुष्काळ की विकून विकून लावली साऱ्या शेताची वाट... आता गेला वर... देवाची शेती करायला... आन आम्हाला सोडलंय इथं.... खाली मरायला.... आवं तुम्हाला काय सांगू.... आन कसं सांगू? लय जीव बेजार हुतुया बघा.. या दुष्काळानं.. हितं शेती कॉरभर...आन पावसाचं कालवण भी भेटना... जगावं का मरावं... तेच कळना... आता ही शेतकरी आत्महत्या करत्यात... तो काय उगीचच व्हय... त्यांचं काय डोस्कं फिरलंय व्हय..... पण इलाजच नाय.. गुरं-ढोरं मेली... त्यांना चारा नाय.... आन नुसतं ऑं वासून... आभाळाकडं बघायचं... कधी येतोय पाऊस?
मला वाटतं हितनं दिसत नाय अन कळत नाय की पाऊस का म्हणून येत नाही.... त्यामुळे शेतकरी आत्महत्या करून वर जाऊन जवळनं बघत्यात की पाऊस का येत नाही?... पण बिचारी स्वतः मरत्यात आत्महत्या करून.... आन आमच्यासारख्यांणा मारत्यात.. आसलं जगणं जगून... पण मी न्हाय घाबरत... एक वेळ उरली सुरलेली शेती विकीन. पण आत्महत्या न्हाय करणार... असं आत्महत्या करायला काय बांगड्या भरल्यात व्हंय....(हाताकडे पाहून) आता गं बया... खरंच बांगड्या हायत की? पण न्हाय.... आत्महत्या करून प्रश्न सुटला असता तर आतापर्यंत एवढी मेली त्यांनी नसता का सुटला प्रश्न? पण मी म्हणते... का म्हणून आत्महत्या करायची? ऐंशी योनी फिरल्यानंतर हा माणसाचा जन्म मिळतो. आन तोही असा फुकट घालवायचा?
नसल येत पाऊस तर काही तरी करा.... धडपड.. म्हणजे कृत्रिम पाऊस निर्माण करा... सिंचन पदती आणा किंवा आहे त्या पाण्यावर जी शेती होऊ शकते ती करा... नाय तर विकून खावा.... पण फुकट मरता? कशाला ? कधी कधी तर मला वाटतं हे जे मरतात ना .. ते दुष्काळामुळे नसल मरत..... त्यांचं वेगळंच लफडं असणार... नाय तर दुष्काळ अख्ख्या गावावर पडतो... मग काय अख्खं गाव काय आत्महत्या करत? पण काय पण म्हणा... मी शेतकरी असून पण अजून आत्महत्या नय केली. कारण मला कळतंय .... उमजतंय.. मी भावी पिढीची कर्तृत्वान महिला आहे. पण खरं सांगू... मला बी या दुष्काळाचा वीट येतो ... आन कधी कधी वाटतं.. नको हे उपासमार जगणं.... त्यापेक्षा मेलेलं बरं... आत्महत्या करून मेल्यावर भूक तरी लागत नाय... पण काय करणार? आता तर विकायला शेती पण उरली नाय... बरं जरी असती तरी विकत घेणार कोण? होतं सगळीच दुष्काळातली... तॉंड आ वासून आभाळाकडं बघणारी... खरंच.... भूक लागली की वाटतं जीव द्यावा... तुम्हाला आता खरं सांगू... अहो.. मी एकदा लय वैतागले.... तवा वाटलं.. आपून बी आत्महत्या करावी.... आन त्या भरात टाकली उडी विहिरीत... पण जळलं मेलं ते पडीक विहीर.... त्यात पाणीच नव्हतं बघा.... सारं गुडघ्याला खरचाटलं... मग आले तशीच धडपडत वर.. म्हटलं... रानातली माती खाऊन टाकावी... म्हणजी त्यात मेलेला उंदीर बिंदीर आला तर झटक्यात मरण... पण कसलं मरण.. उलट पोटच भरलं... मग पाणी पिऊन ढेकर दिला... मग ठरवलं रॉकेल ओतून घ्यावं... पण घरात कायच शिल्लक नव्हतं ... आन दुकानदारान हाकलेलं... मग वाटलं.. गळफास घ्यावा... पन दोर कच्चा निघाला... स्टुलावरून आपटले... कंबरच मोडली.. पण मी ठणठणीत ... मग आता ठरवल बघा... उपोषणाला बसायचं.... म्हणजे प्रसिदी भेटेल आन घरात जेवायला कायच नाय हे लोकांना कळणारच नाही... त्यांना वाटल.. समाजसेवा करताहेत... आन लोकांच्या भल्यासाठी उपोषण करताहेत हा... खरंच आता मी सुधारले.. हाच धंदा बरा... जय हिंद... जय किसान.